Thursday, 9 May 2024

लापता लेडीज !!!!

 


सहजच नेटफ्लिक्स चाळताना हा सुंदर सिनेमा हाती लागला. काही नावंच अशी असतात की, जेव्हा त्यांच्या प्रोडक्शन ची कलाकृती समोर येते तेव्हा आपण ती स्किप नाही करू शकत. आमिर खान हे असंच नाव. २००१ मध्ये आलेल्या "लगान" या ऐतिहासिक चित्रपटानंतर आमिर खान प्रोडक्शन ने खूप चांगले काही सिनेमे केले. त्यामुळे ते नाव पाहिल्यावर लगेचच हा सिनेमा पाहायला घेतला. 


हल्ली गाव दाखवण्याची फॅशन आलेली आहे - पण जर स्क्रिप्ट चांगली नसेल तर सगळीच गावं सारखी वाटतात. विशेषतः उत्तर प्रदेशातली. पण या चित्रपटाची सुरुवात होते ट्रेन मध्ये आणि डब्यात शिरल्या शिरल्याच ३ घुंघट वाल्या नवऱ्या दिसल्यावर आपण हुक होतो लगेच - आणि सिनेमा सुरु होतो - आपल्या मनाची ग्रीप घेत जातो. 


यातले कलाकार फार चांगले घेतलेत - १-२ लोक आपल्या पाह्ण्यातले आहेत. रवी किशन त्यातल्या त्यात सर्वात पॉप्युलर. स्पर्श श्रीवास्तव ला आपण जामतारा मध्ये पाहिलंय. प्रतिभा आणि नितांशी या नवीन असूनही खूपच प्रभावी अभिनय त्यांनी केलाय - काही सीन्स मध्ये फक्त डोळ्यातून. बाकी छाया कदम जिथे काम करतात त्या कलाकृतीचं सोनं करतातच !!! गीता अगरवाल यांचा सुद्धा छोटा पण विशेष रोल आहे. 


हा सिनेमा लेडीज म्हणजेच आजच्या स्त्रियांना पुरेपूर न्याय देणारा सिनेमा आहे. कथा इतकी चांगली आहे, आणि पटकथा छान गुंफलीये - बिप्लब गोस्वामी, दिव्यनिधी शर्मा आणि स्नेहा देसाई यांनी. या उपर या सगळ्यांची मोट बांधणारी अतिशय टॅलेंटेड दिग्दर्शिका किरण राव !!!! 


"लगान" आणि "स्वदेस" या सिनेमा साठी असिस्टंट डायरेक्टर होत्या ह्या मॅडम !!! त्यानंतर अनेक चित्रपटातून नेहेमीच काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न असतो. जसं मी मागच्या लेखात म्हटलेलं  - आपल्याकडे डायरेक्टर महत्वाचा आणि हॉलिवूड मध्ये अभिनेता !!!! सो, किरण राव चा धोबी घाट असाच अप्रतिम होता, आपल्या पब्लिक च्या डोक्यावरून गेला हा भाग अलाहिदा !!!! पण सिनेमा चांगला होता. यासोबत किरण राव यांनी बऱ्याच सिनेमामध्ये प्रोड्युसर म्हणून उत्तम भूमिका बजावली आहे. जसे, पिपली लाईव्ह, तलाश, दंगल वगैरे... 


या सिनेमात स्वतःच्या कुशाग्र आणि संवेदनशील बुद्धीचा अप्रतिम वापर त्यांनी केलाय. एकेक सीन उत्तम लिहून घेतलाय आणि तो दिग्दर्शित करताना वेळ घेऊन काम केलय. हे जाणवत राहतं. दर वेळेस ओरडुनच स्त्रियांनी हक्क मिळवला पाहिजे असं नाहीये. तर स्वावलंबी आणि सुशिक्षित होऊन सुद्धा त्या स्वतःचं  जग निर्माण करू शकतात हे या सिनेमातून अतिशय तरल व सरळ पद्धतीने सांगितलंय. 


शहरी मुलींना हे उमगलंय, त्या आता सगळीकडे उत्तम पाय रोवून उभ्या आहेत पण ग्रामीण भागातल्या मुलींना सुद्धा पंख मिळावे यासाठी असे सिनेमे भयंकर प्रेरणादायी ठरतात - त्यामुळे हा सिनेमा सगळ्यांनी पहिला पाहिजे आणि आपल्या देशात आणि समाजात लोकांनी मुलींना भरपूर शिकू दिलं पाहिजे. 


आपण सर्वांनी हा सिनेमा मुद्दाम पाहावा यासाठी यातल्या इतर डिटेल्स देत नाहीये. तर आजच पहा आणि पाहिला असेल तर तुमच्या मित्रमंडळी आणि परिवाराला दाखवा. परिवरासहित बसून पाहू शकतो असा निखळ आणि सुंदर सिनेमा आहे - लापता लेडीज !!!!!
















 

No comments:

Post a Comment